२०१६ मध्ये लागू झालेल्या राष्ट्रीय जलमार्ग कायद्यांतर्गत “राष्ट्रीय जलमार्ग” दर्जा मिळालेला राष्ट्रीय जलमार्ग-१०, ज्याला अंबा जलमार्ग/धरमतर खाडी म्हणूनही ओळखले जाते, हा २०१६ च्या आधी पण कार्यरत होता. भारतातील राष्ट्रीय जलमार्गावरील होत असलेल्या एकूण मालवाहतुकीमध्ये राष्ट्रीय जलमार्ग-१० ची लक्षणीय भागीदारी आहे. २०२२-२३ या वर्षात, राष्ट्रीय जलमार्गांवरील झालेल्या एकूण मालवाहतुकीत राष्ट्रीय जलमार्ग-१० चा वाट २२.६५ टक्के होता.
भारतीय अंतर्देशीय जलमार्ग प्राधिकरणाच्या अंदाजानुसार या जलमार्गावरील मालवाहतूकीत २०२२-२३ मध्ये २८.५४ दशलक्ष टन पासून २०५२-५३ पर्यंत १६६ दशलक्ष टनापर्यंत अशी लक्षणीय वाढ अपेक्षित आहे. रेवास बंदरापासून धरमतर जेट्टीपर्यंत, अंबा नदीचा १९.४२ किमीचा कार्यान्वित भाग हा एक भरती-ओहोटीच्या नदीमुखाचा भाग आहे जो विविध जलीय वनस्पती आणि प्राण्यांसाठी समृद्ध प्रजनन व निवासस्थान प्रदान करतो. अंबा नदीच्या काठावर राहणाऱ्या हजारो मच्छीमारांनाही नदी उपजीविका देते. या पार्श्वभूमीवर, हा अहवाल राष्ट्रीय जलमार्ग-१० वरील मालवाहतुकीसमोरील आव्हाने आणि सामाजिक-पर्यावरणीय परिणाम समजून घेण्याचा प्रयत्न करतो.